सांगोला – आजच्या इंग्रजी माध्यमाच्या युगात आपल्या मातृभाषेची म्हणजेच जि.प.मराठी शाळांची कमी होत चाललेली गोडी आणि त्यांचे भविष्यातील अस्तित्व या गंभीर विषयावर सांगोल्यातील कुंभार गल्ली येथील मेघा भागवतने गौरी गणपती समोर एका लक्षवेधी सजीव हलत्या देखाव्याचे सादरीकरण केले आहे. या हटके आणि प्रबोधनपर उपक्रमातून मराठी शाळांचे महत्त्व पटवून देत उपस्थितांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या देखाव्यात शाळेची इमारत, वर्गखोल्या, विद्यार्थी, शिक्षक, शालेय परिसर तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. देखाव्याची मांडणी अत्यंत कल्पक व आकर्षक पद्धतीने करण्यात आल्याने पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आजच्या काळात पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता ओढा आणि त्यामुळे ओसाड पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळा, अशी सद्यस्थिती या देखाव्याच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे मांडण्यात आली आहे. तसेच विविध संदेश देणारे बोर्ड लावण्यात आले आहेत. या उपक्रमाचे देखावा पाहणाऱ्या महिलांकडून कौतुक होत आहे. दरम्यान सदर देखावा तयार करण्यासाठी मेघा भागवत सह तिचे वडील काकासाहेब भागवत, आई सुनिता भागवत, भाऊ निरंजन भागवत यांनी परिश्रम घेतले.