सोलापूर – नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला. वसतिगृहातील कचरा गोळा करून तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या दालनात टाकण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नेहरू वसतिगृहातील अस्वच्छता, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच प्रलंबित कामांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकर्ते कचरा घेऊन सीईओंच्या दालनाकडे जात असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची सीईओ जैन यांच्यासोबत चर्चा झाली.
चर्चेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली.
यावेळी सी. ई.ओ. कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच वसतिगृहाशी संबंधित कामांसाठी पुढील आठवड्यात टेंडरवर सही करण्याचे आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यामुळे वसतिगृहातील प्रलंबित कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, योगेश घोडके, रोहित कोकरे, सिद्धाराम फुलारी, महेश हिपळे, सिद्धाराम गुरव, प्रकाश माळी, सुजल कोळी, शहर सचिव अक्षय कांबळे, कुमार गायकवाड आदी सहभागी झाले होते.
Post Views: 9