मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) शहराला येवती (ता. मोहोळ) येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. येवती येथील पंप हाऊसमधील मोटारीत रविवारी सकाळी बिघाड झाल्याने मोडनिंब शहराचा पाणीपुरवठा पुढील काही दिवस बंद राहणार आहे.मोटार दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे संबधिताकडून सांगण्यात आले आहे. ऐन सणासुदीत पाणीपुरवठा पुन्हा बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याच्या अडचणी सुरू असताना आता मोटार बिघाडामुळे आणखी दोन-तीन दिवस पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, उपलब्ध असलेल्या इतर साधनांद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने मोटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मोटार बिघाड, स्टार्टर, मोटार पंप जळणे तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ दुरुस्तीपुरतेच प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.सार्वजनिक बोअरही नादुरुस्त असल्याने नागरिकांची पाण्यासाठी मोठी कोंडी झाली आहे.