गेल्या दीड महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांना सोमवारी झालेल्या परतीच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची दाटी होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पावसाचा जोर कायम होता.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे काही भागातील शेतजमिनीत पाणी साचले असून, कोरड्या पडलेल्या जमिनीला ओलावा मिळाला. पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला.
परिसरातील काही ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. शेतशिवारात पिकांना या पावसाचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, पिकांच्या गरजेनुसार पुरेसा पाऊस होण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाला सुरुवात होताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्येही पावसामुळे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
Post Views: 37