पंढरपूर – श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर ) रात्री श्रींचे दर्शन बंद झाल्यानंतर प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मूर्ती संवर्धनाच्या कामास प्रारंभ करण्यापूर्वी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग तसेच डिजिटल डॉक्युमेंटेशन करण्यात आले. भविष्यातील जतन, संवर्धन, संशोधन व शास्त्रीय अभ्यासासाठी हे डिजिटल दस्तऐवजीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींच्या प्रत्यक्ष संवर्धन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. संवर्धनाच्या प्राथमिक टप्प्यात मूर्तींची शास्त्रीय पद्धतीने संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रियेनुसार मूर्तींवर संरक्षक आवरण ( प्रोटेक्टिव्ह कोटींग ) देण्याचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पार पाडली जात असून, मूर्तींच्या प्राचीन स्वरूपास, पावित्र्यास अथवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
दरम्यान दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री दर्शन बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, प्रणिता भालके, सल्लागार परिषदेचे सदस्य ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प.महादेव महाराज शिवणीकर, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगरचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, पुरातत्त्व विभाग, पुणेचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी आफळे तसेच मंदिर समितीचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
मूर्ती संवर्धनाच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान श्रींच्या मंदिराचे पावित्र्य, धार्मिक परंपरा व सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. संबंधित पुरातत्त्व तज्ज्ञ, अधिकारी व मंदिर समितीच्या समन्वयाने प्रत्येक प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली जात आहे. मूर्ती संवर्धनाचे काम दि.२५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर दि. २६ सप्टेंबर पासून श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत सुरू सुरू करण्यात येणार आहे, असे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगीतले.
Post Views: 9