सोलापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिका व सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष नगरसेविका रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, कामगार कल्याण व सामाजिक न्याय समिती सभापती श्रद्धा पवार, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, उपायुक्त सोनाली यादव, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर, प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेचे उपस्थितांनी कौतुक केले.
स्पर्धेतील विजेते याप्रमाणे –
चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. इयत्ता ५ वी ते ७ वी गटात श्रेया संजय हिरोळी (एसव्हीसीएस हायस्कूल) हिने प्रथम, मोहिनी कांबळे (मनपा शाळा क्र. २) हिने द्वितीय, तर आनम समीर शेख (मनपा उर्दू शाळा क्र. २) हिने तृतीय क्रमांक पटकावला. सृष्टी विनोद दांडगे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इयत्ता ८ वी ते १० वी गटात ऋषिकेश पिठा (कुचन प्रशाला) याने प्रथम, वेदांत पाचकंटी (कुचन प्रशाला) याने द्वितीय, तर रेहान सिकंदर शेख (मनपा शाळा क्र. २) याने तृतीय क्रमांक मिळविला. श्रेया अशीद (एच.डी. प्रशाला) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
Post Views: 33