सोलापूर – शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांच्या नियुक्तीवर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता अडथळा ठरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात समांतर आरक्षण, जात वैधता प्रमाणपत्र तसेच कन्वर्ट राऊंडमधील प्रक्रियेत असलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा सन्मान राखत, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन घेऊन पात्र उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२५ अंतर्गत अनेक उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कागदपत्र पडताळणी, प्रशासकीय कार्यवाही, समुपदेशन तसेच शाळा निवडीची प्रक्रिया पूर्ण केलेले उमेदवार आता नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि नियुक्तीपूर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली आहे, त्यांच्या नियुक्तीबाबत आचारसंहितेच्या नियमांचा विचार करून निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी अथवा स्पष्ट मार्गदर्शन घ्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
चौकट
समांतर आरक्षण, जात वैधता, कन्वर्ट राऊंडमधील उमेदवारांचे काय?
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीमध्ये समांतर आरक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि कन्वर्ट राऊंडशी संबंधित उमेदवारांची प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे याप्रक्रियांना विलंब झाल्यास नियुक्ती आणखी लांबण्याची शक्यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. या उमेदवारांच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणीही पुढे आली आहे.
चौकट
शाळा सुरू, शिक्षकांची गरज कायम
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्यास त्याचा परिणाम शाळांच्या अध्यापन व्यवस्थेवर होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि शाळांची शिक्षकांची गरज लक्षात घेऊन, नियमांचे पालन करत नियुक्ती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेत शासनाने निवडणूक आयोगाशी समन्वय साधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत स्पष्टता निर्माण करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
कोट
आचारसंहितेचा पूर्ण सन्मान ठेवून मार्ग काढावा. निवड प्रक्रियेतील आवश्यक टप्पे पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी. शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेऊन प्रक्रिया गतीने पूर्ण करावी.
— संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र
कोट
पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोग आणि शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक व नियमानुसार निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा.
— प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन