शेतकर्यांचे पीक कर्ज माफ करणे,दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा डेपो सुरू करणे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. शासनाने केवळ जीआर काढून न थांबता प्रत्यक्ष मदत जाहीर करावी, अशी मागणी करत संबंधित जीआरबाबत नाराजी व्यक्त केली.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात दुष्काळाची तीव्रता वाढली असून शेतकरी विविध संकटांना सामोरे जात आहेत. या पोर्शभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून खरीप हंगामातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खासदार शिंदे यांनी बालाजीनगर,मरवडे,येड्राव, जिती, खवे, बावची, जंगलगी आणि सलगर बुद्रुक या गावांचा दौरा केला. अनेक ठिकाणी पिके जळून गेल्याचे तसेच शेतीसाठी पाण्याअभावी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई, पीक विम्याची रक्कम अद्याप न मिळणे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध नसणे, अशा विविध समस्या शेतकर्यांनी खासदारांसमोर मांडल्या. यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले की,दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत आपण शेतकर्यांच्या सोबत असून त्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू,अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतीसाठी म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडणे आवश्यक असून,पाणी सोडले नाही तर शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची तयारी करू,असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी त्यातून शेतकर्यांना प्रत्यक्ष किती मदत मिळणार,याबाबत स्पष्टता नसल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. पंचनाम्याची प्रक्रिया न करता दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,राज्यसचिव रविकिरण कोळेकर,संतोष क्षीरसागर,संदीप पवार,माणिक पवार, डॉ.अंकुश कांबळे, बसवराज धायगुंडे,भगवंत चौगुले,रोहिदास पवार,दत्तात्रय खांडेकर, दौलत माने यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















