सोलापूर : नालेसफाईच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, कर्मचारी व मक्तेदारावर तातडीने कारवाई करून महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करावे.कारवाई न झाल्यास पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागण्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक अनंत जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना नगरसेवक जाधव यांनी निवेदन दिले आहे. सन २०२५-२६ मध्ये रंजीत टूर अँड ट्रॅव्हल्स या मक्तेदारामार्फत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामात अधिकारी व मक्तेदाराच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने १८ ऑगस्ट रोजी अहवाल सादर केला असून, त्यात १९ अधिकारी-कर्मचारी व मक्तेदारांना जबाबदार धरण्यात आल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यानंतर संबंधितांना २४ ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र दोषींवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याऐवजी काही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी आणि इतरांविरुद्ध अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करावे तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाईला विलंब झाल्यास अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होतो, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.
——
Post Views: 5