बार्शी – माहिती अधिकार हा केवळ कायदा नसून पारदर्शक आणि उत्तरदायी समाज निर्मितीचे एक प्रभावी माध्यम आहे. भावी शिक्षिकांनी या कायद्याची सखोल माहिती घेऊन समाजात याविषयी जनजागृती निर्माण करावी, असे प्रतिपादन प्राचार्य श्री. बजरंग वाघमोडे यांनी केले. अध्यापिका विद्यालय बार्शी येथे आयोजित ‘माहिती अधिकार दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानिमित्ताने प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण भित्तिपत्रकाचे (वॉलपेपर) उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक कु. तेजस जाधवर हिने केले.
माहिती अधिकाराचा कायदा हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ असून, नागरिकांना सशक्त बनवण्यासाठी तो कसा उपयुक्त ठरतो, यावर या प्रसंगी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. सुभाष माळी, प्रा. रतिकांत हामणे व प्रा. प्रमोद मांडे यांनी माहिती अधिकाराचा इतिहास, त्याचे नियम आणि विधायक वापर याविषयी विद्यार्थिनींना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. आहेरकर, कु. कोतमिरे, कु. गुळवे आणि कु. कापसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत माहिती अधिकाराविषयी तरुणाईची भूमिका स्पष्ट केली. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धा तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा (Quiz) स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते, ज्याला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अमृता जाधवर हिने केले, तर उपस्थितांचे आभार कु. संजीवनी गोसावी यांनी मानले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.