सोलापूर – मतदार याद्यांमध्ये कथित फेरफार करून मतदारांच्या अधिकारांशी खेळ केल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी सोलापुरात जोरदार आंदोलन केले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेटसमोर झालेल्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्या कार्यकाळातील मतदार याद्यांमधील बदलांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ज्ञानेश कुमार यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला प्रतीकात्मक बेड्या ठोकून निषेध नोंदविण्यात आला.
खा.प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. “मतदार याद्यांमध्ये नियमबाह्य बदल झाले असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
फॉर्म ६ मधील कथित बदल, एस.आर.आय. प्रक्रियेतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचे आरोप आणि निवडणूक आयोगातील निर्णय प्रक्रियेबाबत उपस्थित झालेले प्रश्न यांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. दरम्यान, शेतकरी, दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरही शिंदे यांनी सरकारवर टीका केली.
मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचा अधिकार या मुद्द्यांवरून काँग्रेसने आंदोलनाची धार वाढविल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळाले. आंदोलनाला शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 8