सांगोला – ७५ वर्षांच्या संस्कारांच्या वारशाला अधिक समृद्ध करण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे भक्तिभावाने ऐतिहासिक अभंग पंचविशी व तुकाराम गाथा ग्रंथदान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी अमृतमहोत्सवी ७५ वर्षांच्या प्रवासात संस्थेने विद्यार्थ्यांच्या मनावर उच्च संस्कार व नैतिक मूल्यांची वीण कशी घट्ट केली आहे यावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, प्रमुख पाहुणे सांगोल्याच्या तहसीलदार बाळुताई भागवत, वारी आपल्या दारीचे मार्गदर्शक अविनाश काकडे, डॉ.राजाराम व्हनमाने, सचिन खरात, विशाल चौधरी, घेरडे ट्रस्टचे सचिव डॉ.सुदर्शन घेरडे, जनसेवा प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष हभप.अशोकराव काळे, डॉ.निकिता देशमुख, शीलाकाकी झपके, ॲड.निरज धुमाळ, नागनाथ गायकवाड, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते. ग्रंथदान सोहळ्याचे मर्म आणि महती अविनाश काकडे व हभप.अशोकराव काळे यांनी विषद केली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यामंदिर परिवारातील १० हजार विद्यार्थ्यांना अभंग पंचविशी व ३५० पेक्षा जास्त शिक्षकांना तुकाराम गाथा ग्रंथ प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यामंदिर परिवार, घेरडे ट्रस्ट, जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न नरेंद्र होनराव, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण, उन्मेश आटपाडीकर, आभार प्रदर्शन डॉ.सुदर्शन घेरडे यांनी केले.
चौकट- १
अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. या माध्यमातून एक उत्तम विद्यार्थी, एक सक्षम तरुण आणि एक आदर्श समाज घडवण्याच्या या पवित्र प्रवासात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे.
-डॉ.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा
चौकट- २
हा सोहळा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण ठरला. अमृतमहोत्सवाच्या या पवित्र पर्वावर शाळांच्या माध्यमातून हा वैचारिक वारसा थेट विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला जात आहे, हे या संस्थेचे खरे यश आहे. या महायज्ञाचे फलित म्हणजे उद्याची सुसंस्कृत, प्रामाणिक आणि देशप्रेमी पिढी तयार होईल, यात शंका नाही.
-बाळुताई भागवत, तहसीलदार, सांगोला
Post Views: 10