सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या जय भवानी प्रशालेतील जीर्ण व धोकादायक झालेल्या वर्गखोल्यांच्या ठिकाणी नव्याने सहा वर्गखोल्या बांधण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची पाहणी करताना इमारतीचा काही भाग जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक भागात विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार नाही, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहर सुधारणा समिती सभापती स्वाती बडगु आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जय भवानी प्रशालेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विभागीय अधिकारी एम. एच. बक्षी, उपअभियंता सुनीता हिबारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शाळेत मराठी तसेच कन्नड माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. पाहणीदरम्यान शाळेच्या इमारतीची सद्यस्थिती, वर्गखोल्या आणि परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
सहा वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम
जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांच्या ठिकाणी नवीन सहा वर्गखोल्या उभारण्याबाबत महापौरांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून बांधकामाची कार्यवाही लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी धोकादायक भाग सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिमखाना, मैदानाचीही पाहणी
यावेळी शाळेलगत असलेल्या जिमखान्याची तसेच मैदानाची पाहणी करण्यात आली. जिमखान्याची आवश्यक दुरुस्ती करून तो लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मैदानाभोवती आवश्यक असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळा परिसराचे संरक्षण लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार कंपाऊंड वॉल उभारण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
शाळेच्या परिसरात पडून असलेला कचरा व अनावश्यक टाकाऊ साहित्य तातडीने हटवून परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
मुख्याध्यापकांना दक्षतेच्या सूचना
जय भवानी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य आहे. शाळेतील जीर्ण व धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. आवश्यकतेनुसार नवीन सहा वर्गखोल्यांचे बांधकामही करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, यासाठी शाळा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
—
Post Views: 15