बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या ‘उन्मेष–सृजनरंगाचा’ युवा महोत्सवांतर्गत मातीकाम या कलाप्रकाराची स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालयातील संत तुकाराम ललित कला मंचावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेत आयत्यावेळी देण्यात आलेल्या ‘स्कूल चले हम’ आणि ‘शेतकरी’ या विषयांवर मातीच्या माध्यमातून कल्पक कलाकृती साकारल्या.
स्पर्धकांना आयोजकांकडून आवश्यक क्ले (माती) उपलब्ध करुन देण्यात आली. कलाकृती साकारण्यासाठी किमान दोन तास आणि कमाल अडीच तासांचा कालावधी देण्यात आला. मर्यादित वेळेत विषयाची कल्पना, आकारमान, रचना आणि आशय प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
मातीला पाणी मिसळून ती लवचिक झाल्यानंतर विविध आकार देणे शक्य होते. त्यामुळे हातांच्या कौशल्यासोबत कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि त्रिमितीय रचनेची जाण या स्पर्धेत महत्त्वाची ठरली. माती हे शिल्पनिर्मितीतील प्राचीन माध्यम असून, मऊ आणि प्रसरणशील माती हाताळून आकार घडविण्याची परंपरा प्राचीन काळापासून आढळते.
‘स्कूल चले हम’ या विषयातून शिक्षणाचे महत्त्व, तर ‘शेतकरी’ या विषयातून शेती आणि शेतकरी जीवनाचे विविध पैलू कलाकृतींच्या माध्यमातून मांडण्याचा स्पर्धकांनी प्रयत्न केला.
या स्पर्धेचे परीक्षण स्विटी जोशी, राजू बावीस्कर आणि शिरीष आंबेकर यांनी केले. कल्पकता, विषयाची मांडणी, कलाकृतीची रचना, तांत्रिक कौशल्य आणि एकंदर परिणाम या निकषांवर स्पर्धकांच्या कलाकृतींचे मूल्यमापन करण्यात आले.
Post Views: 16