सोलापूर : शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या अंतर्गत कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा प्राप्त झाल्याचा गौरव साजरा करण्यासाठी ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा – मराठी पाऊल पडते पुढे’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त कलाविष्कारांना व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष अनिल बरवे, नियामक मंडळाचे सदस्य सुरेश मंकणी तसेच मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य, लोककला आणि चित्रपटसृष्टी अशा विविध कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा प्रभावीपणे सादर केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेपासून आधुनिक मराठीच्या बदलत्या प्रवासापर्यंतचा हा कलात्मक प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उलगडला. विविध सांस्कृतिक रंगांनी नटलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या वैभवाचा जागर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पक, उत्स्फूर्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा – मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक महोत्सव संस्मरणीय ठरला.






















