वैराग – लाचखोरी, अमानुष मारहाण आणि महिलांशी असभ्य वर्तनाचे गंभीर आरोप करत वैराग पोलिसांच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध एका महिला आंदोलकाने थेट ‘भीक मागो’ आंदोलन छेडले आहे. पोलिसांच्या भ्रष्ट वृत्तीचा जाहीर निषेध नोंदवत रातंजन (जि. सोलापूर) येथील सुवर्णा डोलारे यांनी वैराग शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानदारांकडे जाऊन भीक मागून अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला. सत्य आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पोलीस ठाण्याच्या विरोधात अशा प्रकारचे पहिलेच आंदोलन पाहायला मिळाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
आंदोलक सुवर्णा डोलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी एका युवकास बेदम व अमानुष मारहाण केली. तसेच, एका प्रकरणात परस्पर सामंजस्याने तडजोड झाली असतानाही वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. एच. काळेल यांनी दोन्ही बाजूंकडून ५० हजार रुपयांच्या बेकायदेशीर लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारदार आणि पीडित कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने देण्यासारखा एक रुपयाही नव्हता. “सर्वसामान्यांचा छळ करणाऱ्या भ्रष्ट पोलिसांना भीक मागून पैसे गोळा करून देऊ, पण अन्याय सहन करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत सुवर्णा डोलारे यांनी शहरात आंदोलन सुरू केले. याशिवाय, पोलीस कर्मचारी काळेल यांच्या अफाट संपत्तीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी अधिकृत तक्रारही त्यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशासनाकडे दाखल केली होती.
बाजारपेठेतून जमा केले पैसे; पोलीस प्रशासनाला अर्पण करून निषेध
आपल्या या तीव्र आंदोलनादरम्यान सुवर्णा डोलारे यांनी वैराग शहरातील किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, मेडिकल, बेकरी आणि इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दारात जाऊन भीक मागितली. पोलिसांच्या लाचखोर प्रवृत्तीचा निषेध करत त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून पैसे जमा केले आणि ते पोलीस प्रशासनाला अर्पण करत आपला तीव्र संताप नोंदवला.
‘पोलीस स्टेशनला परत यायचे नाही का?’ – पोलीस निरीक्षकाची धमकी?
महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने हे आंदोलन शांततेत सुरू असताना, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमूल कादबने यांनी सुवर्णा डोलारे यांना थेट फोन करून “तुम्हाला परत पोलीस स्टेशनला यायचे नाही का?” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या धमकीमुळे पोलिसांची अरेरावी आणि तक्रारदाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याचा दावा करत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
युवकास अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी व्हावी.
महिलेकडे ५० हजार रुपयांची लाच मागीतल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी काळेल यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
पोलीस कर्मचारी काळेल यांच्या अफाट व संशयास्पद अवैध संपत्तीची सखोल चौकशी व्हावी.
वैराग पोलीस ठाण्यातील लाचखोरी, अरेरावी आणि भ्रष्ट कारभाराला तात्काळ आळा बसावा.
पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. एच. काळेल यांची प्रतिक्रिया:
या सर्व गंभीर आरोपांवर वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. एच. काळेल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “स्वतःचे आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पतीचे गैरकृत्य झाकण्यासाठी महापुरुषांच्या फोटोंचा आडोसा घेत भीक मागो आंदोलन करून वैराग पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुवर्णा डोलारे या महिलेने आमच्यावर केलेले पैशांचे आरोप पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे आहेत. निष्पाप ग्रामस्थ व तरुणांवर दबाव आणून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या या महिलेकडे आम्ही पैसे मागितल्याचा कोणताही पुरावा किंवा कॉल रेकॉर्डिंग असल्यास तिने ते जाहीर करावे, अन्यथा तिच्या अशा बेकायदेशीर आणि दबाव तंत्राच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई अटळ आहे.”
पोलीस निरीक्षक अमूल कादबने यांच्याशी संपर्क अपूर्ण संपादकीय नोंद: आंदोलक सुवर्णा डोलारे यांनी पोलीस निरीक्षक अमूल कादबने यांच्यावर केलेल्या फोनवरून धमकी दिल्याचा आरोपांबाबत त्यांची अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू या बातमीत समाविष्ट होऊ शकली नाही.
बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र चर्चा; पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
खाकी वर्दीला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांमुळे संपूर्ण वैराग शहर, बार्शी तालुका व सोलापूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच एका अन्यायग्रस्त महिलेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे, ही पोलीस प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. आता या प्रकरणी सोलापूरचे पोलीस अधीक्षक (SP) काय कडक पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 12