पंढरपूर – महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पंढरपूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळू दे आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी दे,’ असे साकडं विठ्ठलाच्या चरणी घातले. यानंतर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत धडकणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ३१ रुपयांवरच आहे. या काळात मजुरी, नांगरणी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने साखरेचा उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. मात्र, एमएसपीमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.
सध्या बाजारात डाळ १५० ते २०० रुपये आणि शेंगदाणे २०० रुपये किलो असताना साखर मात्र ४० ते ४५ रुपयांवरच अडकली आहे. मिठाईमध्ये ८० टक्के साखर वापरली जाते आणि ती मिठाई ५०० रुपये किलोने विकली जाते. त्यामुळे साखरेला योग्य भाव मिळायलाच हवा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. विठ्ठलाच्या आशीर्वादाने सरकारला सद्बुद्धी मिळेल आणि उसाला योग्य भाव मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 14