सोलापूर – वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर संस्थेतर्फे रविवारी Bio-Solapur पर्यावरण जागर २०२६ या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणप्रेमींचा सन्मान सोहळा व जैवविविधता या विषयावर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गोपाबाई दमाणी ब्लड बँक हॉल, सोलापूर या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरणप्रेमी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून रोहितकुमार गांगर्डे ( वनपरिक्षेत्र अधिकारी ), ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा, अरविंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, सिद्राम पुराणिक, बी. व्ही. शहा इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वडाच्या झाडाला पाणी घालून करण्यात आली.
यानंतर वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर संस्थेतर्फे पर्यावरणप्रेमी श्रीकांत बडवे, कल्याणराव साळुंके, परशुराम लांबतुरे, श्रीकांत कदम, समाधान वाघमोडे, महेश पांढरे, प्रकाश सनपूरकर, सुलोचना बसवेश्वर, पूजा सावंत, दीपक इंगळे, रेस्क्युअर कृष्णा निरवणे व प्रविण जेऊरे यांचा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व उपस्थित मान्यवराच्या हस्ते Bio-Solapur गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व वृक्षाचे रोप असे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी WCAS आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले व पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा व डॉ. अरविंद कुंभार यांनी उपस्थित पर्यावरणप्रेमीना निसर्गातील आपले अनुभव कथन केले.
यानंतर आयोजित माहितीसत्रामध्ये गार्गी गिध यांनी “बीयाँड द कॉनफ्लीक्ट व ओहोटी’ या विषयावर लघुपट सादर केला. यानंतर प्रसाद बोलदे यांचे “सोलापूरची जैवविविधता व संरक्षित क्षेत्राबाहेरील त्यांचे संरक्षण” या विषयावर पिपिटीसहित मार्गदर्शन लाभले.






















