बार्शी – विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी दुष्काळ पाहणी दौरामध्ये गौडगाव ता.बार्शी येथील दुष्काळग्रस्त शेतातील पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन, शेतकरी बांधवांशी संवाद साधाला.
यावेळी कोणत्याही शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये महायुती सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
आमदार राऊत यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आवाहन केले. शासन सरसकट मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही पिके शेतकर्यांच्या हातातून गेली आहेत. त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकर्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. उसाच्या उत्पन्नाचा हेक्टरी उतार कमी निघणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले.
आज आमदार राऊत यांनी गौडगांव, कासारी, जवळगाव, आंबेगाव व वैराग या गावांना भेटी दिल्या. कासारी येथील शेतकरी भानुदास माळी यांनी दुष्काळी परिस्थिती व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. तसेच त्यांनी दुष्काळ पाहणी दौरामध्ये हिंगणी येथील मध्यम प्रकल्पाला भेट देऊन भविष्यात बार्शी उपसा सिंचन योजनेतून बचत होणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे हिंगणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 8