बार्शी – पुणे येथे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बार्शीचे आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची भूमिका योग्य असल्याचे सांगत सोपल यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी ६ ऑक्टोबर रोजी आमदार रोहित पवार तसेच MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र दिले. या पत्रात त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अहोरात्र मेहनत, जिद्द आणि सातत्याने अभ्यास करतात. मात्र, विविध परीक्षांच्या प्रक्रिया रखडणे, परीक्षा वेळेत न होणे तसेच आयोगाच्या कारभारातील काही त्रुटींमुळे विद्यार्थ्यांसमोर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे सोपल यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता असून त्यांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. MPSC आयोगाचा कारभार अधिक पारदर्शक पार आणि गतिमान करण्याची मागणी आमदार सोपल यांनी केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे आणि परीक्षा प्रक्रियेत अनावश्यक विलंब होणार नाही, यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. MPSC च्या माध्यमातून विविध विभागांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मोठ्या संख्येने युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून भरती प्रक्रियेला होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा आणि संधींवर परिणाम करु शकतो. त्यामुळे उपलब्ध रिक्त पदांची भरती जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही न करता शासनाने त्यांच्याशी तातडीने संवाद साधावा, असेही सोपल यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करावी आणि शक्य त्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. आमचा लढा कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील,” अशी भूमिका त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.