सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सोलापूर येथील परिसर तसेच वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संस्थेचे प्राचार्य बिडकर यांना निवेदन देण्यात आले.
मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागाध्यक्ष गोरक्ष उपरे व इरेश करजगी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) परिसरातील तसेच वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांना नियमित व पुरेसा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, तसेच भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी पाण्याच्या टाक्यांच्या नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक निश्चित करावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी यापूर्वीही या समस्येबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी आदित्य मातोळी, ओंकार सोंडेकर, शिवराज नंदरगी, धनराज चटके, संस्कार बगले, सत्यजीत गुरव, शुभम गायकवाड उपस्थित होते.




















