सोलापूर : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी अध्ययन निष्पत्तीचे सातत्याने मूल्यमापन करावे, तसेच मुख्याध्यापकांनी प्रभावी शैक्षणिक नेतृत्व करावे, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय उपसंचालक गणपतराव मोरे यांनी केले.
‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत मोरे यांनी गुरुवारी म. फ. दमानी प्राथमिक शाळा, आयडियल उर्दू शाळा आणि एसव्हीसीएस कन्नड शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली. यावेळी शिक्षणाधिकारी सुजित शिंदे, विशाल मुळे, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने, उपशिक्षणाधिकारी जनबंधू , डायटचे अधिव्याख्याता गजेंद्र जमादार यांच्यासह पर्यवेक्षक आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आढावा घेतला. शिक्षकांकडून तातडीने चाचणी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तपासून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन केले.
विद्यार्थ्यांची प्रगती तपासताना शिक्षकांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. विद्यार्थ्यांना कोणत्या बाबींमध्ये अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, याचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, असे मोरे यांनी सांगितले.दुपारच्या सत्रात व्ही. जी. शिवदारे महाविद्यालय, जुळे सोलापूर येथे शहरातील सुमारे ३०० मुख्याध्यापकांची आढावा बैठक झाली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तावाढ आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्वावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्तावना मल्हारी माने यांनी केली. सूत्रसंचालन कृष्णपरमेश्वर सुतार यांनी केले, तर संतोष बुलबुले यांनी आभार मानले.
—-
Post Views: 15