सांगोला – चालू वर्षी महूद परिसरात पाऊस पडला नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी नीरा उजवा कालव्यातून पाणीपुरवठा विहिरीजवळील बंधारा भरून द्यावा अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलीप केसकर, नवनाथ सरतापे, सागर साबळे यांनी नीरा उजवा कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देऊन दिला आहे. महूद येथील पाणीपुरवठा विहिरीजवळील कासाळगंगा नदीवरील बंधारा निरा उजवा कालवा फाटा क्र.६९ वरून भरून द्यावा. तसेच लहान-मोठे बंधारे व पाझर तलाव भरून दिल्यास महूद परिसरातील नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळासाठी मिटणार आहे. तेव्हा चालू असलेल्या आवर्तनामध्ये हे बंधारे तात्काळ भरून मिळावेत. शिवाय पुढील आवर्तनाच्या वेळीही याबाबत योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांना स्थलांतर करावे लागेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांनाही पाठवलेले आहे.
Post Views: 9