सोलापूर : ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’चा गजर, देवीचा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या बहारदार सादरीकरणाने बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या नवरात्र महोत्सवाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या आकर्षक लेझीमच्या खेळाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अप्रतिम लेझीमचे डाव आणि दानपट्ट्याच्या सादरीकरणाने मिरवणुकीत विशेष रंगत आणली. या उत्साहपूर्ण वातावरणात गुलालाची उधळण करीत देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
रविवारी सकाळी 9 वाजता बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या देवीची विधिवत आणि मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून देवीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी एकसुरात देवीचा जयघोष करीत वातावरणात चैतन्य निर्माण केले. लेझीमच्या तालावर कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या विविध डावांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.
यावेळी मंडळाचे आधारस्तंभ महेश थोबडे, सल्लागार सुधीर थोबडे, ट्रस्टी अध्यक्ष संकेत थोबडे, उपाध्यक्ष सागर हिरेहब्बू, उत्सव अध्यक्ष प्रथमेश थोबडे, राजशेखर हिरेहब्बू, सुनील गुंगे, रेवणसिद्ध आवजे, अजित धुम्मा, प्रतीक थोबडे, सिद्धेश थोबडे, निखिल थोबडे, उत्सव उपाध्यक्ष बसवराज अमणगी, गणेश अक्कलकोट आणि कार्याध्यक्ष सिद्धार्थ खुने यांची प्रमुख उपस्थिती होती.
लेझीमच्या प्रत्येक तालावर कार्यकर्त्यांचा वाढणारा उत्साह, देवीच्या नावाचा अखंड गजर आणि गुलालाची उधळण यामुळे मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पारंपरिक धार्मिक वातावरणासोबतच लेझीमच्या दमदार खेळाने नवरात्रोत्सवाच्या प्रारंभालाच विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलीस चौकी, सराफ बाजार, मधला मारुती आणि टिळक चौक या मार्गाने मार्गस्थ झाली. या मार्गावर देवीच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची उपस्थिती होती.
Post Views: 6