पंढरपूर – गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील एसीआयसी तथा अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर- स्वेरी पंढरपूर अराईज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने स्वेरीमध्ये नुकतीच एकदिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर- स्वेरी पंढरपूर अराईज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा यांच्या नेतृत्वाखाली एसीआयसी तथा अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर मध्ये आयोजिलेल्या कार्यशाळेसाठी मॅग्निफिसीन्स टोटल गिफ्टिंग सोल्युशन्स एलएलपीच्या संचालिका सौ. रश्मी पोंसे व त्यांच्या टीमने सहभागी महिला प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी ५० महिलांना बांबूपासून आकर्षक भेटवस्तू तसेच दैनंदिन वापरातील विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
पारंपरिक हस्तकलेला आधुनिक बाजारपेठेची जोड देत त्यातून उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतील, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिला प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या बांगड्यांचा स्टँड आणि टी-लाईट होल्डर मॅग्निफिसीन्स टोटल गिफ्टिंग सोल्युशन्स एलएलपी यांनी विकतही घेतले. यामुळे महिलांची प्रशिक्षणामधेच विक्री करून व्यवसायाला सुरुवात ही झाली ही एक मोठी अभिमानास्पद बाब होती.
कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर- स्वेरी पंढरपूर अराईज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा यांनी उपस्थित महिला प्रशिक्षणार्थीं बरोबर संवाद साधत मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या पारंपरिक कौशल्यांचा विकास करून त्यांना व्यावसायिक स्वरूप देण्यासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर सौ. रश्मी पोंसे व टीमनी बांबूपासून वस्तू तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बांगड्यांचा स्टँड, टी-लाईट होल्डर आणि कंदील या वस्तू स्वतः तयार केल्या. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना बांबू हस्तकलेचे कौशल्य प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात करण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर- स्वेरी पंढरपूर अराईज फाउंडेशनचे समुदाय संपर्क व्यवस्थापक मधुकर पकाले यांनी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर द्वारे भविष्यात घेण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास, उद्योजकता व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. महिलांच्या कौशल्यांना व्यावसायिक दिशा देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली. अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवरील पारंपरिक कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच महिलांसाठी नव्या स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या कार्यशाळेत पंढरपूर पंचक्रोशीतील जवळपास ५० महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एसीआयसी तथा अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.