सोलापूर – पूर्वी एका दाखल्यासाठी शेतकऱ्याला व लाभार्थ्याला तहसीलसह विविध विभागाचे उंबरठे झिजवावे लागत होते. आता राज्य सरकारने ‘सर्व दाखले एकाच छताखाली’ ही संकल्पना आणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शासन तुमच्या दारात आले आहे, त्याचा फायदा घ्या. निम्बर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांनी सर्व विभागांना एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांची सोय केली आहे .” असे गौरव उद्गार राज्य शासन वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त व निम्बर्गीचे प्रगतशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर निम्बर्गी येथे पार पडले. या शिबिरात शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गंगाधर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील राजकुमार बिराजदार व मंडल अधिकारी राणा वाघमारे, उपस्थित होते.
यावेळी निम्बर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे म्हणाले की “राज्य शासनाच्या निर्देशानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक मंडलात हे महाराजस्व समाधान शिबीर राबवले जात आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ७/१२, ८-अ, फेरफार, ई-केवायसी यासारखे सर्व दाखले तात्काळ मिळावेत हा आहे. वरिष्ठ अधिकारी व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे समाधान शिबीर यशस्वी झाले. यावेळी शेकडो लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याचे मंडळ अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.
निम्बर्गी येथील या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज केले व अनेकांना जागेवरच दाखले वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अशोक राठोड, तलाठी राजेश विटेकर , गणेश भुजबळ, निंगु कोळी, भारत फरताडे, अनिल उमदी, किरण कौटुळे, धनराज साळवे, नेहा पवार, युसुफ शेख, किरण काटे, हर्षल पाटील, रवी कोळी, डॉ. दिपाली कोरे, वाहतूक नियंत्रक अमर यादव , जयश्री दरेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दक्षिण सह सर्वत्र दुष्काळ असल्यामुळे कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले नाही .





















