सोलापूर : दिवाळीच्या सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्या आणि पुणे, मुंबई, हैदराबादसह विविध शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, वाढत्या प्रवासी गर्दीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूरहून दिवाळी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी रेल प्रबंधक अंशुमाली कुमार व डिआरएम सोलापूर यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीच्या वेळी जागा पकडण्याच्या नादात प्रवाशांचे जीव जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. गाड्यांमधील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. धक्काबुक्की, मारामारी आणि भांडणांचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे केवळ प्रवासी संख्या वाढविण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सोलापूर रेल्वे प्रशासनाने दिवाळी विशेष गाड्यांचे नियोजन तातडीने करावे. केवळ एक-दोन डब्यांची वाढ करून हा प्रश्न सुटणार नाही. नवीन विशेष रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे. सोलापूर-मुंबई गाडीचा वापर वन-डे रिटर्न कोल्हापूरसाठी करता येईल का, याचाही विचार व्हावा. पुणेकरांसाठी हुताात्मा एक्स्प्रेस पाठोपाठ दोन तासांच्या अंतराने दुसरी गाडी सोडावी. मुंबईकरांसाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या दोन तास आधी दुसरी रेल्वे सुरू करण्याचा पर्याय तपासावा.
तसेच कलबुर्गी-हैदराबाद इंटरसिटी सोलापूर-हैदराबाद इंटरसिटी म्हणून दिवाळीनिमित्त सुरू केल्यास प्रवाशांना कायमस्वरूपी सोय उपलब्ध होऊ शकते. सिंकदराबाद-हैदराबादहून येणारी हुबळी एक्स्प्रेसही सोलापूरमार्गे धावते. या गाड्यांच्या नियोजनातून सोलापूरसह विदर्भ, मराठवाडा आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होऊ शकतो.
यावेळी स्टेनोग्राफर सुहास जोशी, रविंद्र गुरुकुल आश्रमचे रविंद्र महिंद्रकर, रिजवान मंगलगिरी, राष्ट्रवादी अध्यक्ष संजय भीसे, पुस्तकालयचे अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.






















