अकलूज – शंकरनगर (ता.माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध महिलांचे डोळे तपासणी त्याच बरोबर मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची चांगली सोय झाली आहे.त्यामुळे डोळ्याच्या रूग्णांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सोय उपलब्ध नसल्यामुळे या भागातील जेष्ठ नागरिक व वयोवृध्द महिलांना डोळे तपासणीसाठी अकलूज येथे जावे लागत होते पण आजपासून डोळे तपासणी सुरू झाल्यामुळे अकलूजला जाण्याचा रूग्णांचा त्रास संपला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळ्याचे डॉक्टर अनिल कटके-पाटील यांची नेमणूक झाल्यामुळे शंकरनगर, पानीव,खुडूस, विझोरी, विजयवाडी,गिरझणी, चौंडेश्वरवाडी,उदयनगर या गावातील लोकांची डोळे तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे.जेष्ठ नागरिक व महिला वर्ग यांच्या डोळ्यांची तपासणी व मोफत मोतीबिंदुची शस्त्रक्रियेची करण्यात येणार आहेत.
जनकल्याण आरोग्य समितीचे सदस्य शहाजीराव माने-देशमुख यांनी डाॅ.अनिल कटके-पाटील व वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमोल आव्हाड यांचा फेटा,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विजयवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा जनकल्याण आरोग्य समितीचे सदस्य उमेश भंडारे, सुभाष पाटोळे,श्रीमती क्षीरसागर, श्री.पवार,आरोग्य सेविका श्रीमती चाबुकस्वार,हणमंत चव्हाण यावेळी उपस्थित होते.