सोलापूर : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने शहरात धडक मोहीम सुरू केली असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यासह नळजोडणी बंद करण्याची कारवाईही हाती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ५३ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे.
चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने वसुली मोहिमेला वेग दिला आहे. २९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात ९३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. तर ३० ऑक्टोबर रोजी ६० लाख रुपयांची वसुली झाली. दोन दिवसांत झालेली ही मोठी वसुली महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, पथदिवे यांसह विविध नागरी सुविधा पुरविण्यासाठी या उत्पन्नाचा उपयोग होतो. त्यामुळे कराची नियमित वसुली करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आता कठोर पावले उचलली जात आहेत. संबंधित मालमत्ता सील करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नळजोडणी बंद करण्याची कारवाई केली जात आहे.
कारवाई टाळण्यासाठी कर भरा
मालमत्ताधारकांनी थकीत तसेच चालू वर्षाचा मालमत्ता कर तातडीने भरून महापालिकेला सहकार्य करावे. थकबाकीदारांनी कर भरण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता कराचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची वेळ येण्यापूर्वीच आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
Post Views: 49