सोलापूर : देशासह महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये असंतोष असून, सत्ताधारी भाजप जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोर्चे आणि रॅली काढत आहे. सोलापुरात काढण्यात आलेली भाजपची रॅली ही ‘लोकशाही वाचवा’ नव्हे, तर ‘गुंडगिरी वाढवा’ रॅली आहे, असा घणाघाती आरोप शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
डोंगरे म्हणाले, भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह महिलांवर दबाव टाकून धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांना धमकी देण्यात आली, तर पत्रकार निरंजन बोद्दूल यांना मारहाण करून उलट त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष ज्योती गायकवाड यांच्या घरी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन माफीनामा व्हिडिओची मागणी केली. तसेच फेसबुकवरील कमेंटचा राग धरून युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक कन्ना यांनाही धमकी देण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
शहरातील महत्त्वाची विकासकामे करण्याऐवजी भाजपचे लोकप्रतिनिधी धमक्या आणि मारामाऱ्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत. पोलिसांना हाताशी धरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्ते अशा दडपशाहीला घाबरणार नाहीत. यापुढे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही गणेश डोंगरे यांनी दिला.
—–