सोलापूर : शहरातील अरुंद गल्लीबोळ, दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये आग लागल्यास आता अग्निशमन दलाला तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रॉयल एनफिल्ड बुलेटवर आधारित १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल करण्यात आल्या आहेत. या दुचाकींचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल आणि आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेवक अक्षय अंजीखाने, बिजू प्रधाने, प्रशांत पल्ली, व्यंकटेश कोंडी, युवराज सर्वदे, रवी कयावले, सिद्धेश्वर कमटम, बसवराज केंगणालकर, सात्विक बडवे, नगरसेविका कलावती गदगे, संगीता जाधव, सारिका चाबुकस्वार, परिवहन विभागप्रमुख सारिका आकुलवार आणि अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंके यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
शहरातील वाढते नागरीकरण, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी यामुळे आगीच्या घटनांवेळी मोठ्या अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येतात. अनेकदा वाहन पोहोचेपर्यंत आगीचा विस्तार होण्याची शक्यता असते. ही अडचण लक्षात घेऊन महापालिकेने अग्निशमन दलात दहा विशेष दुचाकींचा समावेश केला आहे. त्यामुळे आगीची माहिती मिळताच अग्निशमन कर्मचारी कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून प्राथमिक स्तरावर आग नियंत्रणात आणण्याचे काम करू शकणार आहेत.
या फायर बाईक्स अत्याधुनिक अग्निशमन उपकरणांनी सुसज्ज आहेत. प्रत्येक दुचाकीवर २४ लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाण्याचा दाब निर्माण करणारा विशेष पंप आणि होज रीलची व्यवस्था करण्यात आली आहे. आगीच्या सुरुवातीच्या टप्प्यात या उपकरणांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करता येणार आहे. विशेषतः अरुंद गल्लीबोळ, झोपडपट्टी परिसर, व्यापारी संकुले आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये या दुचाकी उपयुक्त ठरणार आहेत.
मोठ्या अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत या दुचाकींच्या माध्यमातून प्राथमिक अग्निशमन कार्यवाही करता येईल. त्यामुळे आगीचा फैलाव रोखण्यास आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमी करण्यास मदत होणार आहे.
Views: 13