बार्शी – शिक्षण, संशोधन, साहित्य आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत बार्शी येथील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांना ‘डॉ. कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या १२ डिसेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे दिमाखदार समारंभात वितरण होणार आहे.
डॉ. राहुल पालके हे गेल्या १४ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी शिक्षण, संशोधन आणि साहित्य निर्मितीच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. इंग्रजी विषयात पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. पालके यांनी नऊ विषयांमध्ये यूजीसी-नेट, सेट आणि गेट या परीक्षांमध्ये तब्बल २२ वेळा यश संपादन केले आहे. विविध ज्ञानशाखांमध्ये सातत्याने यश मिळविण्याची त्यांची ही कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे.
अमिताव घोष यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आशयाचा त्यांनी पीएच.डी. संशोधनातून अभ्यास केला आहे. अध्यापनासोबतच संशोधन, मार्गदर्शन, व्याख्याने,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी भाषा विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या क्षेत्रांतही ते सक्रिय आहेत. कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करीत आहेत.
डॉ. पालके यांनी ‘कर्मांजली’, ‘अंगणातून नभांगणात’, ‘कर्मवीर प्रेरणा’, ‘कर्माक्षरे’, ‘अबोली’ आणि ‘निशिगंध’ या सहा पुस्तकांचे लेखन केले आहे. कविता, वैचारिक लेखन आणि सामाजिक जाणिवांच्या अभिव्यक्तीतून त्यांनी साहित्यविश्वातही आपले योगदान दिले आहे.
अध्यापनातील सातत्य, विविध विषयांतील शैक्षणिक यश, संशोधनाची आवड, साहित्यनिर्मिती आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले मार्गदर्शन अशा बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.