निंबर्गी : दीपावलीचे औचित्य साधून राष्ट्रप्रथम यूथ फाउंडेशन, निंबर्गी यांच्या वतीने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेला बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ९ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. स्पर्धेत एकूण २९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. भक्ती सोलापुरे हिने प्रथम, रोहन बंदीचोडे याने द्वितीय, तर सिद्धराम सुतार याने तृतीय क्रमांक पटकावला. दीपक लोहार व श्रेयस मोरे यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळाले.
किल्ले बांधणी स्पर्धा ही केवळ बक्षिसांपुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. त्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. परमानंद जवळकोटे यांनी किल्ले उभारताना मुलांमध्ये संघभावना, नियोजनक्षमता, अडचणींवर मात करण्याची जिद्द आणि सर्जनशीलतेचा विकास होत असल्याचे सांगितले. राष्ट्ररक्षक महासंघाचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुका विविध क्षेत्रांत अग्रेसर असून निंबर्गीसारख्या प्रगतशील गावातील असे उपक्रम नव्या नेतृत्वाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धाराम वाघ होते. यावेळी उपसरपंच पिरसाब हवालदार, पोलीस पाटील सिद्धरामप्पा बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य अरुण बिराजदार, प्रमोद बिराजदार व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक गोपाळ कोळी उपस्थित होते.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल सचिन कोळी व यास्मिन मुल्ला मॅडम, तसेच गावात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल विद्युत विभागाचे तांत्रिक अधिकारी हर्षल पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते बसवंत करजगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकांचे प्रायोजक म्हणून मल्लिनाथ सुतार, सचिन खट्टे व स्वराज प्रतिष्ठान, इंदिरानगर, निंबर्गी यांनी सहकार्य केले. सर्व २९ स्पर्धकांना फाउंडेशनतर्फे स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना आध्यक्ष सूरज शेख तर सूत्रसंचालन सचिव कलप्पा गुरव यांनी केले,मल्लिकार्जुन हालबन्ने यांनी आभार मानले. फाउंडेशनचे , उपाध्यक्ष अक्षय संगेदार, खजिनदार आदित्य जाधव, अविनाश लाडे, सिद्धाराम डोंगरे, अक्षय गुरव, उमेश कोळी, अजय गुरव, सागर पाटील, अनिल अळगी यांच्यासह सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
Views: 13