सोलापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या २० बसेसपैकी १८ वातानुकूलित बसेस आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. हलगीच्या कडकडाटात बसेस मार्गस्थ झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.वचनपूर्ती केल्याचा सार्थ अभिमान असेल्याची भावना महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केली.
प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिका परिसरातील कै. अप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. इलेक्ट्रिक बसेसचे विधिवत पूजन करून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनी तिकीट काढून वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पुन्हा महापालिकेपर्यंत प्रवास करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बसमधील वातानुकूलित सुविधा आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सोयींचा अनुभव घेतला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तळवलकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगीता जाधव, वंदना गायकवाड, मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक मेघनाथ येमूल, प्रशांत पल्ली, बिजू प्रधाने, सात्विक बडवे, युवराज सरवदे, ऋषिकेश मेटे, सिद्धेश्वर कमटम, ज्ञानेश्वर म्याकल,
अक्षय अंजीखाने, जयकुमार माने, सत्यनारायण गुर्रम, , नगरसेवक व्यंकटेश कोंडी, शिवाजी तात्या वाघमोडे, भारतसिंग बडूरवाले, दीपक तसेच नगरसेविका विजया खरात यांच्यासह परिवहन विभाग नियंत्रण अधिकारी सारिका आकुलवार, परिवहन व्यवस्थापक व्यंकटेश गुडसेलू, वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले , महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वातानुकूलित बसचे किमान तिकीट १० रुपये
महापालिकेला एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, पहिल्या टप्प्यात २० बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १८ बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्यात आल्या असून दोन बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित आहेत. पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक दोन किलोमीटरसाठी पाच रुपये तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे माफक दरात वातानुकूलित प्रवासाची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
शहरातील ९, ग्रामीण भागातील ७ मार्गांवर सेवा
शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील सात अशा एकूण १६ मार्गांवर या बसेस धावणार आहेत. बससेवेचे दोन सत्रांत नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात सकाळी ६ ते दुपारी २, तर दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते रात्री १० या वेळेत बससेवा उपलब्ध राहणार आहे. इलेक्ट्रिक बसेसमुळे वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
परिवहन व्यवस्था पुन्हा उर्जितावस्थेत
आणणार : महापौर कोंड्याल
सोलापूरकरांसाठी आज खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली इलेक्ट्रिक बससेवा दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष सुरू होत आहे. या बसेसच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक, वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ई-बससेवा सुरू होणार नाही, चार्जिंग स्टेशनची व्यवस्था नाही, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, सर्व अडचणींवर मात करून आज प्रत्यक्ष बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान आहे. यापूर्वी २०० बसेस उपलब्ध होऊनही त्या रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. परिणामी शहराच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, माझ्या कारकिर्दीत ई-बसेस सेवा सुरू होत आहे, याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
२० रुपयांत शहराच्या एका टोकापासून
दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास : नरेंद्र काळे
महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार परिवहन व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा शब्द आम्ही पूर्ण केला आहे. पहिल्या टप्प्यात २० बसेस दाखल झाल्या आहेत. सध्या १८ बसेस प्रत्यक्ष सेवेत सुरू होत आहेत. पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक दोन किलोमीटरसाठी पाच रुपये तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे २० रुपयांत शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करता येणार आहे.
अनेक दिवसांनंतर शहरात ई बससेवा सुरू होत आहे. नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी केले.
——-