सोलापूर – शेतकऱ्यांच्या उसाला हक्काचा आणि निश्चित दर मिळावा, पहिली उचल कारखानदारांनी मनमानीने नव्हे तर ठरवून द्यावी, या मागणीने आता सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. १६ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी जिल्हाभरात जोरदार तयारी सुरू झाली असून गावोगावी बैठका, मोबाईल संदेश आणि प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनाही प्रतिटन पहिली उचल निश्चित करून मिळावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो, उत्पादनासाठी लाखोंचा खर्च करतो; मात्र ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्याच्या दराबाबत अनिश्चितता कायम राहते. कारखानदारांनी एकतर्फी दर जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पहिली उचल निश्चित करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. गावोगावी बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांकडूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांना मोर्चाबाबत अधिकृत निवेदने देण्यात आली आहेत.
कारखानदारांची पाठ फिरली; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीलाही दांडी!
या आंदोलनातील सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला कारखानदारांनी स्वतः उपस्थित राहण्याचे टाळत कार्यकारी संचालक आणि शेती अधिकाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कारखानदारांची ही भूमिका म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती असलेली उदासीनताच असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा मोबदला ठरविण्याची वेळ आली की कारखानदारांना समोर यायला वेळ का मिळत नाही, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.
राजू शेट्टींचा पंढरपूर दौरा; आंदोलनाची रणनीती निश्चित
मोर्चाच्या तयारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथे येऊन शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आंदोलनाची दिशा आणि रणनीती निश्चित करताना मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या आंदोलनात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार असल्याने आंदोलनाला अधिक आक्रमक स्वरूप येण्याची शक्यता आहे.
संघटना वेगळी, पण ऊसदराची मागणी एकच!
ऊसदराचा प्रश्न हा केवळ एका संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा विषय नसून जिल्ह्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे संघटनेचे झेंडे वेगवेगळे असले तरी शेतकऱ्यांच्या न्याय्य दराची मागणी एकच आहे. या भूमिकेतून विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही मोर्चात ताकदीने सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.
आता सोमवारच्या मोर्चातून शेतकऱ्यांचा आवाज जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किती बुलंदपणे पोहोचतो आणि कारखानदारांच्या भूमिकेत काय बदल होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला दर ठरवून मिळणार की पुन्हा आश्वासनांचे गाजर दाखविले जाणार? हा खरा सवाल आहे.
—
ठळक चौकट :
आता आश्वासन नको, उसाला हक्काचा दर हवा!
शेतकरी ऊस पिकवतो, कारखान्याला पुरवतो; मात्र त्याच्या घामाचा मोबदला किती मिळणार, हे ठरविण्याची वेळ आली की अनिश्चितता निर्माण होते. ही मनमानी आता थांबली पाहिजे. कारखानदारांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पहिली उचल निश्चित करावी. अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सोमवारचा मोर्चा हा केवळ शक्तिप्रदर्शन नसून ऊस उत्पादकांच्या हक्काच्या लढ्याचा एल्गार ठरणार आहे.
Views: 13