सोलापूर – जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अद्याप कायम असून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील २२९ गावे आणि ९५७ वाड्यांमधील तब्बल ३ लाख ९९ हजार ९३५ नागरिकांसह १ लाख ९५ हजार २९७ पशुधनासाठी प्रशासनाकडून २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी ही माहिती दिली. टंचाईग्रस्त भागात नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजीची ही स्थिती असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पाणी उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील ५० विहिरी आणि ३२ बोअरवेल असे एकूण ८२ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. त्यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासह उपलब्ध जलस्रोतांचा वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
तालुकानिहाय परिस्थिती पाहता मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४५ गावांना ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल सांगोला तालुक्यातील ३९ गावांसाठी ५५ टँकर धावत आहेत. अक्कलकोट तालुक्यात २७ गावांसाठी १७, माढा १६ गावांसाठी २२, बार्शी १७ गावांसाठी ७, करमाळा १६ गावांसाठी १५, माळशिरस ११ गावांसाठी ११, उत्तर सोलापूर ९ गावांसाठी १६, दक्षिण सोलापूर ७ गावांसाठी १०, मोहोळ १० गावांसाठी १७, तर पंढरपूर तालुक्यातील एका गावासाठी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
विशेष म्हणजे, केवळ नागरिकांची तहान भागविणेच नव्हे, तर पशुधनासाठीही पाण्याची व्यवस्था करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. उन्हाळ्यापूर्वीच टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन, टँकरच्या फेऱ्यांवर देखरेख आणि अधिग्रहित जलस्रोतांचा प्रभावी वापर करणे आवश्यक बनले आहे.