बार्शी – बार्शी तालुक्यात ऊस गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींचा वर्दळीच्या रस्त्यांवरील वावर वाढला आहे. मात्र अनेक वाहनांना रिफ्लेक्टर, इंडिकेटर आणि मागील दिवे नसणे, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे तसेच एका ट्रॅक्टरला दोन ते तीन ट्रॉल्या जोडून वाहतूक करणे, यामुळे वाहन चालकांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकारांकडे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
सध्या बार्शी तालुक्यातील खामगाव आणि उपळाई ठोंगे येथील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असून, या कारखान्यांकडे होणारी ऊस वाहतूक बार्शी शहरातून तसेच शहरालगतच्या मार्गावरुन सुरु आहे. कुडुवाडी रोड, पोस्ट चौक, बार्शी शहर पोलीस ठाणे परिसर, बसस्थानक चौक, मांगडे चाळ, पाटील चाळ आणि शिवाजी महाविद्यालय रोड या वर्दळीच्या मार्गांवरुन अवजड ऊस वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसलेली वाहने मागून येणाऱ्या वाहनचालकांना सहज दिसत नाहीत. ट्रॉलीबाहेर लोंबकळणारा ऊस, बंद टेललॅम्प, क्षमतेपेक्षा अधिक वजन आणि मोठ्या आवाजातील म्युझिक सिस्टिममुळेही अपघातांची शक्यता वाढते. साखर कारखान्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, ट्रेलर आणि बैलगाड्यांवर रिफ्लेक्टर टेप व रेडियम पट्टया बसविल्याची खात्री करूनच वाहतुकीस परवानगी देणे अपेक्षित आहे.
गळीत हंगामासाठी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमधून ऊस वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांच्या क्षमतेनुसारच ऊस वाहतूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बार्शी तालुक्यात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. इतर तालुक्यांप्रमाणे बार्शीतही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी तपासणी मोहीम, जनजागृती आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Views: 27