माहूर :२०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांनी किनवट-माहूरचे राजकारण ढवळू लागले आहे. मनोमिलनानंतर महायुती कायम राहिली तर जागावाटपावरून रस्सीखेच होणार की महायुतीच तुटून नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.
एकत्रीकरणाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा नाही!
शरद पवार-अजित पवार तसेच उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गट एकत्र येण्याबाबत कयास व्यक्त होत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही गटाकडून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
नाईकांचा वारसा की नवा चेहरा; प्रशांत राठोड भाजपवासी होणार?
दिवंगत आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनानंतर पत्नी बेबीताई, पुत्र कपिल आणि पुतणे सचिन माधवराव जाधव (नाईक) यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र, नाईकांच्या राजकीय वारशाला पर्याय म्हणून माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील भूमिपुत्र तथा मंत्रालयीन प्रशासकीय अधिकारी प्रशांत राठोड यांचे नावही चर्चेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून लोकसेवावादी कार्य आणि जनसंपर्कामुळे जनसामान्यांत परिचित असलेले राठोड लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर ते सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असून, भाजपवासी होणार की अन्य पक्षाचा पर्याय स्वीकारणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपचे भीमराव केराम यांना ९२ हजार ८५६, प्रदीप नाईक यांना ८७ हजार २२०, तर अपक्ष सचिन नाईक यांना ५ हजार ५११ मते मिळाली होती. केराम यांचा विजय ५ हजार ६३६ मतांनी झाला होता. त्यामुळे मतविभाजनाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
भाजपची जागा की मित्रपक्षांचा दावा?
सध्या मतदारसंघ भाजपकडे असून आमदार भीमराव केराम विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास नाईकांच्या राजकीय वारशाच्या आधारे राष्ट्रवादीकडून, तर शिवसेनेचे गट एकत्र आल्यास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रभावातून शिवसेनेकडून दावेदारी होण्याचे कयास आहेत. महायुती कायम राहिली तर जागावाटपाचा पेच, अन्यथा नव्या आघाड्यांची समीकरणे निर्माण होऊ शकतात.
आमदार भीमराव केरामांना ‘नामदार’ करण्याची मागणी!
आमदार भीमराव केराम यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आदिवासी विकासमंत्रिपद किंवा अन्य महत्त्वाचे मंत्रिपद द्यावे, अशी मागणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांतून होत आहे. मंत्रिपदांची खांदेपालट झाल्यास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपवावे, अशी अपेक्षा आहे. दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासीबहुल माहूरच्या विकासप्रश्नांना प्राधान्य मिळावे, ही या मागणीमागील भावना आहे.
२०२९ मध्ये कोणती करवट?
नाईकांचा राजकीय वारसा, प्रशांत राठोड यांचा संभाव्य राजकीय प्रवेश, भाजपची विद्यमान जागा आणि मित्रपक्षांची दावेदारी या मुद्द्यांमुळे किनवट-माहूरचे राजकारण चर्चेत आले आहे. महायुतीचे भवितव्य आणि पक्षीय समीकरणे स्पष्ट झाल्यानंतरच २०२९ च्या उमेदवारीचे चित्र उलगडणार आहे.


















