माहूर : यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे आणि धनोडा बंधाऱ्याच्या कामामुळे माहूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आंतरजिल्हा स्तरावर पुढाकार घेत यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. वेणी धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचे एक आवर्तन सोडण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, यासंदर्भात अपर जिल्हाधिकाऱ्यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. या मागणीसंदर्भातील निवेदनावर नगराध्यक्ष दोसानी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माहूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा नदी शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मराठवाडा-विदर्भ सीमेवरील शेकापूर-धनोडा परिसरातून वाहते. याच नदीपात्रातून नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा केला जातो. वेणी धरणातून पाण्याचे एक आवर्तन सोडल्यास माहूरच्या पुढील तीन ते चार महिन्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माहूर हे श्री रेणुका माता मंदिरामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष दोसानी यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आता या मागणीला प्रशासनाकडून किती लवकर प्रतिसाद मिळतो आणि पैनगंगा नदीपात्रात प्रत्यक्ष पाणी कधी सोडले जाते, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.
चौकट
माहूरकरांच्या पाण्यासाठी पाठपुरावा थांबणार नाही!
“माहूरकरांची तहान आणि श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळणे ही आमची प्राथमिकता आहे. वेणी धरणातून पैनगंगा नदीपात्रात एक आवर्तन सोडल्यास पुढील तीन ते चार महिन्यांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळेल. प्रशासनाने या मागणीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घ्यावा. माहूरला पाणी मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.”
— फिरोज दोसानी, नगराध्यक्ष, माहूर






















