मुदखेड – तालुक्यासह शहरातील अनेक पात्र शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली अग्रिम पाच हजार रुपयांची दुष्काळी आर्थिक मदत अद्याप मिळालेली नसल्याने ही रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेडचे महासचिव गिरीश भीमअप्पा कोत्तावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कमी पाऊस, पावसातील खंड, पिकांचे नुकसान आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर झालेली मदतही अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. बँक खाते, आधार लिंकिंग, ई-केवायसी तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेकांची मदत प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित गंगाधर मगरे सेवादल तालुकाध्यक्ष, बंडू पाटील खानसोळे,बळवंत पाटील पुयड, गौस मुल्ला, अनिस भाई, सुरेश पाटील खानसोळे ईत्यादी उपस्थित होते काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
मुदखेड तालुक्यातील व शहरातील मदतीपासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची रक्कम तात्काळ जमा करावी, मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा,बँक खाते, आधार लिंकिंग, ई-केवायसी व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,पात्र शेतकऱ्यांना मदत न मिळण्याची कारणे तपासून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवावा,शेतकऱ्यांना मदतीसाठी शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे.
शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, वंचित शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा कृषी कार्यालय, नांदेड तसेच तहसीलदार, मुदखेड यांनाही देण्यात आली आहे.























