सांगोला – विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आ.स्व.गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख (वय- ६९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता.११) निधन झाले.
गेले काही दिवस ते आजारी होते. पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्व.गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहून विक्रमी अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, इतक्या मोठ्या राजकीय वारशाची पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवला नाही. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते.
आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात व त्यांना आमदार बनविण्यामागे पोपट देशमुख यांचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता.१२) सकाळी ९ वाजता पेनूर (ता.मोहोळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




















