सोलापूर – सहारा गन हाऊससमोर आज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की तो संपूर्ण परिसरात घुमला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या भीषण स्फोटात केदार सिद्धप्पा छत्रे (वय ५३ वर्ष रा.रामलिंग नगर, विजापूर रोड, सोलापूर ) हे कामगार जखमी झाले .
ही घटना जुनी मिल चाळ परिसरात घडली .
जुनी मिल चाळ परिसरात बाळासाहेब प्रभाकर फुल्ले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊस मध्ये जखमी केदार सिद्धप्पा छत्रे हे कामाला आहेत.ते आज सोमवारी संध्याकाळी गंधकाने भरलेले काडतुसे कारमध्ये ठेवत असताना हा स्फोट झाला. यात दोन्ही पाय भाजून ते गंभीर जखमी झाले .त्यांना उपचारासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना सोलापूर मार्कंडेय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच फौजदार सावडी पोलीस ठाण्याचे पथक, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (बीडीएस), फॉरेन्सिक टीम, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.



















