वैराग – शेतकऱ्यांच्या भूमीत जन्म घेत सायकलवरून नोकरीच्या शोधात निघालेला एक सर्वसामान्य तरुण, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधींच्या सोन्याचा व्यवसाय यशस्वीपणे हाताळत आहे. बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावचे रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय सोने व्यावसायिक आप्पासाहेब कोंढारे यांच्या यशाचा हा थक्क करणारा प्रवास सोलापूर येथील ‘विश्वमंगल बिझनेस फोरम’च्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
सायकलवरून सुरक्षारक्षक ते आंतरराष्ट्रीय व्यावसायिक
शिकरणे सारख्या ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या आप्पासाहेब कोंढारे यांनी सुरुवातीला ठाण्यातील ‘चिंतामणी ज्वेलर्स’ येथे सुरक्षारक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम सुरू केले. प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी सुवर्ण व्यवसायात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. आज त्यांचा व्यवसाय फक्त भारतापुरता मर्यादित नसून दुबई, आफ्रिका, घाना, बुरकिना फासो आणि टांझानिया यांसारख्या विविध देशांमध्ये विस्तारलेला आहे.
विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यशस्वी उभारणी
त्यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांनी पुढील प्रमुख कंपन्यांची यशस्वी स्थापना केली आहे:
APK Jewelers LLC (दुबई)
AU Resources Limited (घाना)
Appake Enterprises Limited (घाना)
SABA SARL (बुरकिना फासो, आफ्रिका)
ASHA Trading Company Limited (टांझानिया, आफ्रिका)
कोंढारे ज्वेलर्स (बार्शी)
घाना देशात ३ र्या क्रमांकाचे व्यावसायिक म्हणून गौरव
आप्पासाहेब कोंढारे यांच्या ‘AU Resources Limited’ या कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत घाना देशाने त्यांना आपल्या देशातील ‘३ र्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक’ म्हणून सन्मानित केले आहे.
दुबई विमातळावर उतरणाऱ्या टनांमधील सोन्याचा व्यवहार
एका वेळी शेतात धान्याचे उत्पादनही जेमतेम होणाऱ्या गावातून आलेल्या कोंढारे यांच्या दुबईतील मुख्य कार्यालयातून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर टनांच्या पटीत सोन्याच्या आयातीचे व विक्रीचे व्यवहार सांभाळले जातात. कार्गो विमानाद्वारे दुबई विमानतळावर उतरणाऱ्या हजारो किलो सोन्याचे नियंत्रण त्यांच्या माध्यमातून होते, ही संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
सोलापूर येथील विश्वमंगल बिझनेस फोरमच्या मंचावरून त्यांच्या या संघर्षमय आणि यशोगाथेचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.
Post Views: 7