सोलापूर- एर्टिगा मोटार कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण मित्र जागीच ठार झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ आज मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली.
संकल्प शिवपुत्र गुरव (वय २२ वर्ष) आणि नागनाथ मल्लाप्पा बिराजदार (वय २८ वर्ष, दोघे रा. धोत्री ,दक्षिण सोलापूर ) असे आहे.
वरील दोघे मित्र हे आज मंगळवारी पहाटे मोहोळ कडून सोलापूर च्या दिशेने एर्टिगा कार( क्र. MH १३ DT-८०९३) ने येत असताना तेलंगवाडी गावाजवळ समोरील जाणाऱ्या ट्रक (TN ५४- R ८८८१) ला त्यांची कार पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर दोघांना तात्काळ येथील शासकीय रुग्णालयात पहाटे दोन वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
यातील मयत संकल्प गुरव हा व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंगचे काम करत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर मयत नागनाथ बिराजदार हा गोकुळ शुगर फॅक्टरीमध्ये कामाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
























