धाराशिव – धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत करून आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बसवराज पाटील यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रदीर्घ अनुभव, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि महायुतीच्या विचारांप्रती असलेली निष्ठा यामुळे मतदारसंघातील लोकप्रतिनिधी त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीच्या एकजुटीच्या बळावर आणि विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवून विक्रमी मताधिक्याने विजय संपादन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच मतदारसंघातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी बसवराज पाटील यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार दिनकरराव माने, अरविंद निलंगेकर, नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सुनील चव्हाण, बापूराव पाटील, ओमप्रकाश शेटे, अफसर शेख, अनिल काळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.