वैराग – गणेशोत्सवाच्या काळात नदी, विहिरी आणि स्थानिक जलस्त्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एकता महिला मंचच्या वतीने आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एक अत्यंत स्तुत्य आणि अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात जमा झालेल्या तब्बल २००० किलो निर्माल्यापासून (हार, दुर्वा व पूजा साहित्य) सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याच्या अभिनव प्रकल्पाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज, दिनांक २९ सप्टेंबर रोजी वैराग येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते, तसेच एकता महिला मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला.
‘पवित्रतेकडून समृद्धीकडे’: अशा प्रकारे साकारला प्रकल्प
प्रकल्पाची माहिती देताना एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की, “गणेशोत्सवात जलप्रदूषण रोखणे आणि गोळा झालेल्या निर्माल्याचा योग्य पुनर्ववापर करून त्याला खताचे रूप देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. वैराग येथे या प्रकल्पासाठी एकता महिला मंचच्या सदस्यांनी विशेष कंपोस्ट बेड तयार केला आहे. या बेडच्या पहिल्या थरात पालापाचोळा, दुसऱ्या थरात शेणखत आणि त्यानंतर संकलित केलेले निर्माल्य टाकण्यात आले आहे. पुढील आठ दिवसांत यामध्ये गांडूळ सोडले जाणार असून, त्यातून अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होईल.”
वैराग परिसरात आणि सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकल्प उभा राहिला असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पोलीस प्रशासनाचा एकता महिला मंचला नेहमीच भक्कम पाठिंबा राहील!” सुहास जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी) “एकता महिला मंचने हाती घेतलेले हे कार्य अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. महिला भगिनींनी एकत्र येऊन उभारलेला हा सेंद्रिय खत प्रकल्प जलप्रदूषण रोखण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा आणि सर्व पोलीस बांधवांचा या उपक्रमास तसेच पुढील काळात होणाऱ्या सर्व चांगल्या सामाजिक कार्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा, पाठबळ आणि सहकार्य राहील.”
जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद; पुढील वर्षी मोफत खत वाटपाचा संकल्प
या मोहिमेअंतर्गत कुर्डूवाडी पोलीस ठाणे, माढा पोलीस ठाणे, बार्शी शहर व तालुका पोलीस ठाणे, वैराग पोलीस ठाणे आणि पंढरपूर परिसरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले.
या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी सांगितेल की, “पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. ही आमची मोठी अचिव्हमेंट असून यापुढे आमची टीम अधिक विस्तारून पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा केले जाईल. त्यातून तयार होणारे सेंद्रिय कंपोस्ट खत गरजू शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत वाटप केले जाईल.” यासाठी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे, पोलीस बांधव आणि नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप साहेब यांचा एकता महिला मंचच्या वतीने भावुक व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केल्यामुळे महिला सदस्यांचा उत्साह व प्रतिष्ठा अधिक द्विगुणीत झाली.
प्रास्ताविक: एकता महिला मंच जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार
सूत्रसंचालन: अश्विनी डाके
आभार प्रदर्शन: रेणुका चौगुले
उपस्थित प्रमुख महिला पदाधिकारी:
या सोहळ्यास एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, राजश्री बादगुडे, रेणुका चौगुले, अश्विनी डाके, संगीता डाके, अमृता वाघमारे, लक्ष्मी मोरे, लोचना डाके, अनिता डाके, इंदुमती डाके, उषा भांगे, सुनीता जांभळे, रजनी घोंगडे, मनीषा कापसे, मंगल डाके यांच्यासह मंचच्या अनेक सदस्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 8