बार्शी – स्त्री-पुरुष, जात-पात अथवा धर्म असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला समान वागणूक मिळून भारतीय संविधानाने दिलेला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांनी केले.
संविधान दिनानिमित्त नवीन मराठी शाळेत घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही वेगळे कलागुण आणि क्षमता दडलेल्या असतात. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांची ओळख करुन घेत त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्याला घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृती आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच जास्तीत जास्त वाचनाची सवय लावून घ्यावी. वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक . तुकाराम आगावणे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विनायक देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सहशिक्षक उमेश नायकुडे, कुलदीप काकडे ज्योती बगले यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उमेश नायकुडे यांनी केले.
Views: 54