सोलापूर : प्राध्यापकांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA) यांच्या पुढाकारातून एक आठवड्याचा “प्राध्यापक विकास कार्यक्रम” सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. “क्षमता उजागर करणे : रसायनशास्त्र शिक्षणतज्ज्ञांना सशक्त बनविणे” या विषयावर आधारित हा उपक्रम दि. ४ मे ते ८ मे २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
हा कार्यक्रम एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव
सोलापूर येथे होणार असून रसायनशास्त्र व संबंधित शाखांतील प्राध्यापकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील नवे ट्रेंड, उद्योग-शिक्षण समन्वय आणि अध्यापनातील नवकल्पना या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. पद्मश्री डॉ. गणपती डी. यादव, डॉ. प्रकाश महानवार (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) डॉ. ए. ए. घनवट (संचालक, रासायनिक विज्ञान शाळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस एच पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमासाठी देशातील नामांकित शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पद्मश्री डॉ. गणपती डी. यादव, डॉ. दिनेश आमलेरकर, डॉ. संजय चराटी, डॉ. प्रकाश वाडगांवकर, डॉ. एस. एच. पवार, डॉ. जी. एस. ग्रोव्हर, डॉ. सुनिता बर्वे यांच्यासह सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील अनेक वरिष्ठ वैज्ञानिकांचा समावेश आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विद्यापीठांतील प्राध्यापकही मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत पॉलिमर सायन्स, केमिकल इंजिनिअरिंग, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. प्राध्यापकांना अध्यापन कौशल्य वाढविण्यासोबतच संशोधनासाठी नवे दृष्टिकोन मिळावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमामुळे सोलापूर शहरात शैक्षणिक वातावरणाला नवी उभारी मिळणार असून स्थानिक तसेच राज्यभरातील प्राध्यापकांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
























