सोलापूर : शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि सक्षम मार्गदर्शन यांचा सुंदर संगम साधत हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूरने यंदाच्या इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल 98.06% लागला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीने महाविद्यालयाचा लौकिक अधिकच उंचावला आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेत खिलती हेमल शहा आणि ईशान शंतनू शहा यांनी प्रत्येकी 94.50% गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे सुयोग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
त्यानंतर रिया सिद्धार्थ गांधी आणि सनोबर मोईनुद्दीन नदाफ यांनी 93% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तनिष्का प्रभाकर काटवे हिने 92.67% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता अधोरेखित केली.
चौथ्या क्रमांकावर हिमांक नेहल केनिया आणि सिद्धी ओनिल गांधी यांनी प्रत्येकी 92.33% गुण मिळवत स्थान मिळवले, तर स्वराग संतोष कोंडा याने 92.17% गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची उंची गाठली आहे.
विषयवार गुणवत्तेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. प्रणाली बिराप्पा चेंडके हिने अकाउंटन्सी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष प्राविण्य सिद्ध केले. तसेच तनिष्का प्रभाकर काटवे हिने अर्थशास्त्र विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून आपली बौद्धिक क्षमता अधोरेखित केली.
या यशामागे महाविद्यालयातील अभ्यासपूर्ण वातावरण, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचा पाठिंबा यांचा मोठा वाटा आहे. या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, एमबीए विभाग प्रमुख डॉ. प्रितम कोठारी,समन्वयक सारिका महिंद्रकर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा निकाल केवळ टक्केवारीचा नसून विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, परिश्रमांचा आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेल्या ठोस पावलांचा प्रेरणादायी प्रवास आहे. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की योग्य दिशा, समर्पण आणि चिकाटी यांच्या जोरावर यशाची शिखरे सहज गाठता येतात.























