सोलापूर : काँग्रेस भवनालगत असलेल्या मेडिकेअर ब्लड सेंटरमधून रक्तमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी संबंधित ब्लड सेंटरची पाहणी करण्यात आली होती. यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य विभागाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड भरला नसल्याने पुन्हा ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दोन्ही मिळून एक लाख रुपयांचा दंड थकीत राहिल्याने अखेर बुधवारी ब्लड सेंटर सील करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. मात्र, गुरुवारी संपूर्ण दंडाची रक्कम भरण्याचे आश्वासन दिल्याने सीलची कारवाई तूर्तास थांबविण्यात आली.
काँग्रेस भवनालगत असलेल्या मेडिकेअर ब्लड सेंटरमधून रक्तमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने ब्लड सेंटरची पाहणी केली. पाहणीदरम्यान काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने संबंधितांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम भरण्याबाबत महापालिकेकडून सूचना आणि स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही दंडाची रक्कम भरली गेली नाही.
दंडाची रक्कम थकीत राहिल्याने आरोग्य विभागाने पुन्हा ५० हजार रुपयांचा दंड आकारला. त्यामुळे ब्लड सेंटरकडे महापालिकेची एकूण एक लाख रुपयांची दंडाची रक्कम थकीत झाली. वारंवार सूचना देऊनही दंड न भरल्याने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी ब्लड सेंटर सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी त्या पथकासह मेडिकेअर ब्लड सेंटरमध्ये दाखल झाल्या.
दरम्यान, संबंधित ब्लड सेंटरच्या व्यवस्थापनाने गुरुवारी एक लाख रुपयांची संपूर्ण दंडाची रक्कम धनादेशाद्वारे भरण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बुधवारी करण्यात येणारी सीलची कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली. मात्र गुरुवारी दंडाची रक्कम जमा न झाल्यास कोणतीही मुदत न देता पुढील कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी स्पष्ट केले आहे.
दंड न भरल्यास रोज ५० हजारांचा दंड
गुरुवारी एक लाख रुपयांचा थकीत दंड न भरल्यास मेडिकेअर ब्लड सेंटरला दररोज ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली. त्यामुळे गुरुवारच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
—
Post Views: 7